शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाई; नांगरटी ठप्प, शेकडो एकर शेती पडीत राहण्याची भीती”


शेवगाव (प्रतिनिधी): सज्जाद पठाण 
खरीप हंगाम तोंडावर असताना शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, नांगरटीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पंपांवर तासन्तास रांगा लावूनही डिझेल मिळत नसल्याने शेतीची अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मे महिना हा मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात नांगरट, रोटाव्हेटर आदी यंत्रांच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार केली जाते. मात्र यंदा डिझेलच्या अभावामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वेळेवर मशागत न झाल्यास जमिनीतील ओलावा टिकत नाही, तण नियंत्रण होत नाही आणि पिकांची वाढ खुंटते. परिणामी संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदा दुष्काळाचे सावट असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे. “डिझेल नसेल तर शेती करायची कशी?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतात काम करावे की पंपावर थांबावे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, पुढील 8 ते 15 दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता असताना वेळेवर नांगरट न झाल्यास शेकडो एकर जमीन पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“फक्त आश्वासने नकोत, शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल मिळाले पाहिजे. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल,” असा इशारा देत तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना डिझेल पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटना व शेतकऱ्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸