वाईत प्रसिद्ध चप्पल शोरूमला भीषण आग - आगीत संपूर्ण दुकान जळून खाक

शहरातील गजबजलेल्या चित्रा टॉकीज परिसरातील गणपती आळी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका प्रसिद्ध चप्पल-बूट शोरूमला अचानक भीषण आग लागली. या आगीत 'मधू फुटवेअर' हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. पहाटेच्या शांततेत लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास मधू फुटवेअर या दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा निघू लागल्या. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारील टपरीलाही आपल्या कचाट्यात घेतले. पहाटेच्या वेळी हा थरार पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून वाई नगरपालिका अग्निशमन विभाग आणि वाई पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे धाडस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र, आग एवढी भीषण होती की, तोपर्यंत दुकानातील चप्पल, बूट आणि अन्य मौल्यवान साहित्य जळून कोळसा झाले होतेहे दुकान मनोजकुमार चंदेस्वर राम यांच्या मालकीचे आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने आणि दुकानात कोणीही नसून वेळेत आग आटोक्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸