देवनागरी अक्षरे ओळखणाऱ्या तंत्रसाधनाच्या पेटंटला भारत सरकारची मान्यताप्रा. डॉ. ज्योती माने यांची उल्लेखनीय कामगिरी
वरवंड (ता. दौंड) येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. ज्योती माने यांनी विकसित केलेल्या "Device for Devnagari Characters Recognition" (देवनागरी अक्षरे ओळखणारे तंत्रसाधन) या संशोधनाधारित शोधाला भारत सरकारकडून पेटंट मान्यता प्राप्त झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवनागरी लिपी ही भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या लिपींपैकी एक असून हिंदी, मराठी, संस्कृतसह अनेक भाषांमध्ये तिचा वापर केला जातो. या लिपीतील अक्षरे, शब्द, वाक्ये, जोडाक्षरे, संयुक्त अक्षरे आणि विविध चिन्हे अचूकपणे ओळखून त्यांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी डॉ. माने यांनी हे अत्याधुनिक तंत्रसाधन विकसित केले आहे.
या प्रणालीमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा मॉड्यूल, संगणकीय यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मॉड्यूल, डिस्प्ले युनिट, डेटा संचयन मेमरी, तसेच वापरकर्ता नियंत्रण प्रणालीचा समावेश आहे. त्यामुळे छापील, कोरलेले किंवा हस्तलिखित स्वरूपातील देवनागरी मजकूर सहजपणे ओळखून त्याचे संपादनयोग्य डिजिटल रूपांतर करता येते.
जुनी पुस्तके, वर्तमानपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, हस्तलिखिते आणि अभिलेख यांचे जतन व डिजिटायझेशन करण्यासाठी हे तंत्रसाधन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भाषा संशोधन, ग्रंथालय व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, दस्तऐवज व्यवस्थापन तसेच शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्येही याचा मोठा उपयोग होणार आहे. विशेषतः हस्ताक्षरातील विविधता आणि गुंतागुंतीच्या अक्षररचनांची अचूक ओळख करून देण्याची या प्रणालीची क्षमता उल्लेखनीय मानली जात आहे.
डॉ. ज्योती माने यांच्या या संशोधन कार्याबद्दल वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय (अण्णा) दिवेकर, ज्येष्ठ संचालक अंकुशभाऊ दिवेकर, विश्वस्त विजयराव दिवेकर, प्राचार्य डॉ. अनिल शितोळे, उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर, प्राध्यापक वर्ग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. ज्योती माने यांना पेटंट मान्यता
देवनागरी अक्षरे अचूकपणे ओळखून त्यांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणाऱ्या तंत्रसाधनाला भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्राधारित शिक्षण आणि अक्षर ओळख तंत्रज्ञानावर आधारित हे साधन देवनागरी लिपीतील पुस्तके, हस्तलिखिते व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच भाषा संशोधन आणि माहिती जतनाच्या क्षेत्रातही हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.
टिप्पण्या